Friday 27 November 2015

♻प्रश्नमंजुषा – ०४ - उत्तर♻

अंतराळवीर अवकाशात लिहिण्यासाठी कोणते साधन वापरतात? थोडक्यात माहिती द्या.
________________________

प्रश्न वाचून तुम्ही पटकन म्हणाल, ते नक्कीच लिहिण्यासाठी पेन किंवा पेन्सिल वापरत असतील. तुमचं म्हणण अगदी बरोबर आहे. पण तुम्ही शाळेत वापरतात तशी पेन्सिल किंवा पेन अंतराळवीर वापरत नाहीत. त्यांच्याकडे वेगळ्याच प्रकारचं पेन असत. यालाच 'स्पेस पेन' किंवा 'झिरो gravity' पेन असं म्हणतात. पॉल फिशर यांना हे पेन बनवण्याच श्रेय जातं. त्यांनी बनवलेलं हे पेन विज्ञान जगतातील महत्वपूर्ण संशोधनही मानलं जातं. कारण अंतराळात गुरुत्वाकर्षण कमी असत त्यामुळे साध्या पेनातून शाई बाहेर येत नाही किंवा पेन्सिल जरी वापरली आणि तिचं टोक तुटलं तर अंतराळयानात मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकत. हे पेन्सिलच टोक कोणाच्या डोळ्यात नाकात जाऊन त्यानं इजा होऊ शकते किंवा यानातल्या इतर यंत्रात शिरून यंत्र खराब होण्याचाही धोका होता, त्यामुळे अंतराळवीरांना लिहिण्यासाठी अशा साधनाची गरज होती, जे गुरुत्वाकर्षण नसतानाही काम करू शकेल. १९६५ साली पॉल फिशरमन यांनी पहिलं स्पेस पेन बनवलं आणि आपलं संशोधन नासाकडे दिलं. या पेनला नासाच्या अनेक चाचण्यांमधून जाव लागलं हे पेन फक्त अंतराळात नाही तर पाण्यातसुद्धा याचा वापर केला जाऊ शकत होता. तेलकट पदार्थांवर लिहिण्यासाठीही याचा उपयोग होतो. पॉल यांनी बनवलेल्या स्पेस पेनाचं दुसरं वैशिष्ट्य असं होतं की, ते जास्त तापमानाला लिहू शकत.

पहिले ३ प्रतिसाद -
निवेदिता खांडेकर - अंतराळवीर अवकाशात 'स्पेस पेन' वापरतात. हा पेन गॅसनी भरलेला बॉल पॉइंट पेन असतो की जो zero gravity किंव्हा अति उष्ण तापमानात किंव्हा vacuum  मध्ये पण चालतो. साधी पेन्सिल सुद्धा वापरली होती आणि आता फेल्ट टिप च पेन सुद्धा वापरतात - ||ज्ञानभाषा मराठी||
राजू शिंगणे - अंतराळवीर  लिहिण्यासाठी zero gravity पेनाचा उपयोग करतात. याचा उपयोग पाण्यात , कोणत्याही दिशेस आणि तापमानात करता येतो , आणि गुरुत्वाकर्षणाचा कोणताही परिणाम होत नाही. यामध्ये नायट्रोजनच्या विशिष्ट दाबाचा परिणाम असतो - इतर
विनोद गवारले - अंतराळात मध्ये fisher space pen वापरला जातो त्या पेन मध्ये gas व थिक्सऑट्रॉपिक नावाची शाही असते जे झिरो ग्रॅव्हिटी मध्ये सुद्धा लिहू शकते हा पेन 1968 मध्ये सर्व प्रथम वापरला गेला होता. - इतर

      ||ज्ञानभाषा मराठी||
||माझी शाळा📚माझी भाषा||

   संदेश पुढे पाठवा

Wednesday 25 November 2015

♻प्रश्नमंजुषा – ०३♻

♻प्रश्नमंजुषा – ०३♻
➖➖➖➖➖➖➖

पाणी उकळताना बुड़बुडे का तयार होतात?
________________________

परिपूर्ण उत्तर खालीलप्रमाणे -

पाणी उकळताना तुम्ही पाहिलं असेल. शेगडीवर पाण्यान भरलेलं पातेल ठेवलं कि थोड्या वेळाने बुडबुडे यायला सुरुवात होते. पाणी उकळताना हे बुडबुडे कसे तयार होत असतील याचं आश्चर्य तुम्हाला वाटत असेल. पाण्यामध्ये ऑक्सिजन किंवा विरघळलेले वायू असतात.जेव्हा पाणी आपण उकळवायला घेतो, तेव्हा पाण्याच तापमान वाढतं, आणि या पाण्यामध्ये असलेल्या वायूची पाण्यात विरघळण्याची क्षमता कमी होत जाते. त्यामुळे हे वायू पाण्यातून बाहेर पडण्यास धडपडत असतात.म्हणूनच आपल्याला पाणी उकळताना सुरुवातीला भांड्याच्या तळाला काही बुडबुडे दिसतात. पाणी अधिक उकळू लागले कि आणखी बुडबुडे दिसू लागतात. पाणी एका विशिष्ट उकलनबिंदुला पोहोचलं की हे बुडबुडे तयार होतात. पाण्याला जास्त उष्णता दिली कि त्याची वाफ व्हायला सुरुवात होते. एका विशिष्ट तापमानाला पाणी उकळण्याची आणि वाफ तयार होणे या दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी होतात त्यामुळे आपल्याला पाण्यात बुडबुडे दिसतात.

काही सदस्यांनी उत्तरे देण्याचा चांगला प्रयत्न केला..
# प्रणय गावंड - सामान्यतः पाण्यामध्ये विविध वायु विरघळलेले असतात...पाण्याला उष्णता दिली असता ते तापते व् हे वायु उष्णतेच्या प्रभावाने प्रसारण पावतात व बुडबुडंयाच्या स्वरुपात वर येतात....

# सौ. अंजली दाखोले - पाणी तापवताना बुडाशी असलेल्या पाण्याच्या कणां चे तापमान त्याच्या उत्तकलनांक पर्यन्त पोहोचते व् त्यांचे वाफ़ेत रूपांतर होऊन ते वर जाते. त्याची जागा वरचे पाणी भरून काढ़ते व् पुन्हा त्याही कणांना उष्णता मिळून ,त्याचेही वाफ़ेत रूपांतर होऊन तेही बुडबुड्याच्या रूपाने वर जाते.(कारन वाफ द्रव पाण्यापेक्षा हलकी असते.) म्हणून पाण्याचे बुडबुडे दिसतात.

# अमोल डोंगरे - जे वायु पाण्यामध्ये विरघळलेल्या अवस्थेत असतात ते उष्णते मुळे बाहेर येतात.

      ||ज्ञानभाषा मराठी||
||माझी शाळा📚माझी भाषा||

   ➡संदेश पुढे पाठवा➡

Monday 23 November 2015

प्रश्नमंजुषा - २

समाधानकारक उत्तर न मिळाल्याने, विजेता घोषित करण्यात येणार नाही.

ध्रुवीय ज्योती काय आहे?

आकाशात सूर्यमावळतीला येताना, केशरी, तांबड्या, कधी कधी गुलाबी रंगाच्या छटा निर्माण होतात. ते दृश्य किती नयनरम्य असतं. पण आकाशात या छटा सूर्योदय किंवा सूर्यास्ताला पाहायला मिळतात. पण उत्तर-दक्षिण ध्रुवावर आकाशात दिसणाऱ्या रंगछटा काहीशा वेगळ्या असतात. आकाशात निऑन रंगाचा प्रकाश दिसू लागतो. या प्रकाशाला ऑरा लाईट असे म्हटले जाते. ध्रुवाच्या चुंबकीय क्षेत्रात येणाऱ्या अणूची टक्कर झाल्यावर अशा प्रकारचा प्रकाश निर्माण होतो. मंगळ, गुरु, नेपचून या ग्रहांवर देखील अशा प्रकारचा प्रकाश पहायला मिळतो. दोन्ही ध्रुवावर जेव्हा हिवाळा ऋतू सुरु होतो तेव्हा अशा स्वरूपाचा प्रकाश दिसू लागतो.

     ||ज्ञानभाषा मराठी||
||माझी शाळा-माझी भाषा||

Friday 20 November 2015

कुत्रा पाळणे – खूप काही शिकवणारा अनुभव

प्लूटोच्या ५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने….
-सुचिकांत वनारसे
मित्रांनो गेली ५ वर्षे माझ्याकडे labrador कुत्रा आणि साधारण ३.५ वर्षाचा भारतीय जातीचा पिवळ्या रंगाचा बोका आहे. कुत्रा शोधताना डोक्यात एकच चित्र होतं! ते म्हणजे बेताब चित्रपटात सन्नी देओल कडे जसा कुत्रा आहे तसाच कुत्रा पाळायचा. त्यावेळी भारतीय जातीचा कुत्रा पाळावा, किंवा त्यातील लहान-मोठ्या गोष्टी माहित नव्हत्या आणि माहित देखील करून घेतल्या नाहीत, तिथे थोडी चूकच झाली .. ही कुत्रा घेतानाची पहिली चूक जी बहुतांशी लोक करतात.. याचा अर्थ प्लुटो मुळे मला पश्चाताप वगैरे झाला आहे असे मुळीच नाही. ती चूक सुधारत २०१२ मध्ये मी भारतीय बोका पाळला. माझा बोका खाऊन-पिऊन आणि शिकार करून मस्त असतो.
मी कुत्र्याचे पिल्लू निवडताना मस्त किस्से झाले. मी त्यावेळी दिल्लीत ‘ओल्ड राजिंदर नगर’ मध्ये राहायचो. ५ वर्षांपूर्वी मला, कुत्र्याचे पिल्लू साधारण ९००० रुपयांना घ्यावे लागले. रोज गुगल करून ब्रीडरला फोन करायचो. एक वेळ अशी आली कि कुत्रा पाळायचा विचार देखील सोडून दिला. मनासारखे पिल्लूच मिळेना. त्यात मूळ Labrador पिल्लू कसे तपासावे याचे निकष देखील गुगल वर तपासत बसायचो. अनेक ठिकाणी, हे ब्रीडर कुत्र्यांची अवस्था शेळ्या-मेंढरांसारखी करतात. दावणीला जशी गुर बांधलेली असतात त्याच प्रमाणे कुत्री बांधलेली असतात. त्यांच्या शरीरावर कसलेच तेज नसते, केवळ आयुष्य जगत असतात. अशा अनेक धंदेवाईक ब्रीडर्सला नाही म्हटल्यावर शेवटी एक बरा ब्रीडर भेटला.
घरापासून काही अंतरावर, त्याने मला कुत्र्याची पिल्ले पाहायला बोलावले. तिथे जर्मन शेपहर्ड, Labrador वगैरे जातींची पिल्ले होती. जर्मन शेपहर्ड पिल्ले थोडी मोठी असतील. प्लुटो त्यावेळी साधारण ४० दिवसांचा होता. त्याला पाहताक्षणी मला तो जाम आवडला. त्याला काय वाटले कोणास ठाऊक त्याच खोलीतील २ जर्मन शेपहर्ड पिल्लांवर जाऊन तो भुंकून आला, त्यावेळी तर मला भारी अभिमान वाटला. मग काय! दिले पैसे आणि आणलं घरी! आणि rest is history …
काही दिवसांपूर्वी माझ्या एका मित्राला देखील कुत्रा घ्यायचा होता, त्यावेळी त्याला मी बरेच मार्गदर्शन केले. अर्थात या कुत्रा पाळणे प्रकरणात गुगल/युट्युब चा मोठा फायदा होतो बरका! त्याचशिवाय सीजर मिलान – डॉग व्हिस्परर सारखे कार्यक्रम तुमच्या माहितीत भर घालत असतात. चला, तर एकेक मुद्याला हात घालूया ..
१. कोणती जात आणि किती वयाचे पिल्लू घ्यावे – शक्यतो भारतीय वातावरणासाठी सर्व बाजूंनी योग्य अशी भारतीय जात निवडावी. कुत्र्याचे पिल्लू किमान ४५ दिवस आणि जास्तीत जास्त ४-६ महिने त्याच्या आईजवळ राहिलेले असावे, म्हणजे त्यांच्या नैसर्गिक गोष्टी ते आई कडून शिकतात. शु करताना, पाय उचलून शु करणे वगैरे. प्लुटो आजदेखील पाय उचलून शु करत नाही, माझ्या मते याचे कारण हेच आहे, कि त्याला खूप लवकर मी आईपासून तोडले. ही माझी दुसरी चूक झाली.
जगातील कुठल्याही जातीचा कुत्रा घ्या .. अगदी ग्रेट डेन असुदे नाहीतर उंदरासारखा भासणारा, dashmand hound अनेक गोष्टी त्यांच्यात सारख्याच असतात.(मराठी म्हण – कुत्र्याची जात सारखीच असते) भारतीय जातीच्या कुत्र्यांची जमेची बाजू म्हणजे, बहुतांशी कुत्र्यांच्या अंगावर कमी केस असतात, त्यामुळे केसांची गळती देखील कमी होते, याविरुद्ध कमी केसांच्या जातीमध्ये प्रसिद्ध ,Labrador च्या केसांची गळती देखील मोठ्या प्रमाणात होते. भारतीय कुत्र्यांचा जबडा लहान असतो, डोक्याचा आकार लहान असतो त्यामुळे अपघाताने देखील चावल्यावर तुलनात्मक दृष्ट्या जर्मन शेपहर्ड किंवा रॉटवायलरच्या चावण्यापेक्षा कमी गंभीर जखम होते. बाहेरच्या जातींच्या कुत्र्यांची त्वचेच्या विकारांसाठी देखील खूप काळजी घ्यावी लागते. त्यासाठी वेगवेगळी महागडी डॉग फूड बाजारात उपलब्ध आहेत.
माझ्या अनुभवानुसार मी हेच सांगीन कि भारतीय जातीचा कुत्रा पाळा. उदा. माझी आवडती पारिया जात.
या जातीची मूळ कुत्री मी नागपूरच्या बाजूला मोठ्या प्रमाणात पाहिली आहेत. टवकारलेले कान, वर्तुळाकार शेपूट, आणि मुख्यत्वे तांबूस रंगात ही कुत्री असतात. बाकी रंगात देखील असतात, पण बहुतांशी तांबूस रंगात पाहायला मिळतील. आपल्या गल्ली बोळात देखील जी कुत्री असतात ती उत्कृष्टच असतात. त्यांना मोन्ग्रेल असे म्हणतात. ही कुत्री पाळणे म्हणजे प्रतिष्ठेचा प्रश्न होऊन बसतो. शहरात मात्र क्वचितच टवकारलेले कान पहायला मिळतील. कारण क्रॉस प्रकार मोठ्या प्रमाणात होतो. यातून जन्म झालेली ही, मोन्ग्रेल जमात आहे… आईचे कान टवकारलेले आणि बापाचे कान पडलेले असतील, तर पिल्लाचा एक कान टवकारलेला तर दुसरा पडलेला असतो. हाच प्रकार डोळ्यांच्या रंगाच्या बाबतीत देखील आहे. पण तुम्ही जर डॉग शेल्टर म्हणजेच कुत्र्यांच्या अनाथालयात गेलात तर तुम्हाला अनेक पर्याय मिळू शकतील आणि तिथूनच कुत्रा घ्यावा असे मी सुचवतो. बाकी देखील महागड्या आणि सुंदर भारतीय जाती आहेत. उदा. राजापायलम, शिकारी-हाउंड, इत्यादी.
२. कुत्राच्या पिल्लाच्या, घरातील पहिल्या काही रात्री –
पिल्लाची घरातली पहिली रात्र अत्यंत आव्हानात्मक असते. आईपासून पिल्लू तुटलेले असते आणि त्यामुळे रात्रभर ते व्हिवळत राहते. त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे. इथे शेजाऱ्यांचे सहकार्य मोलाचे ठरेल. मग सवय झाली, कि रात्रीचे पिल्लाचे व्हिव्हळणे कमी होते. पण चुकून देखील पिल्लू व्हिव्हळत आहे म्हणून त्याच्याकडे लक्ष देऊ नये. प्लुटोचे सांगायचे झाले तर तो पहिल्या रात्रीपासून माझ्या अंगावर भुंकत होता. पूर्ण दुर्लक्ष करा..
३. शि-शु ची सवय – हे अत्यंत आव्हानात्मक आणि तुमची सहनशीलता तपासणारे काम आहे. पहिले ६ महिने, हा त्रास होणारच. सुदैवाने, दिल्लीत माझा टेरेस flat असल्याने शि-शु च्या वेळेस प्लुटो टेरेस वर शि-शु करून यायचा. मग आम्ही पाण्याने पूर्ण टेरेस धुवून काढायचो/त्याने पुन्हा त्याच ठिकाणी शि-शु करू नये म्हणून, व्हिनेगर टाकायचो.
आता सवय कशी लावाल?
पिल्लाला पिंजऱ्यात ठेवावे. कुठलाही पाळीव प्राणी जिथे झोपतो, खातो, तिथे शि-शु करत नाही. ही मोठी जमेची बाजू असते. पिल्लाला खायला आणि झोपायला पिंजऱ्यातच ठेवावे. म्हणजे शि-शु च्या वेळेस ते ओरडतात. मग त्यांना बाहेर काढून अपेक्षित ठिकाणी घेऊन जा. त्यातही तुम्ही १२व्या, १५ व्या मजल्यावर राहत असाल तर हे शक्य नाही. तुम्हाला शौचालयात/न्हाणीघरात/गच्चीत एखादा कोपरा निश्चित करून तिथली सवय पिल्लाला लावावी लागेल. माझ्या मित्राने हेच केले, त्याला त्याच्या कुटुंबियांमुळे शक्य झाले नाहीतर अवघड काम होऊन बसले असते. लहान पिल्लाला दिवसातून ४-५ वेळा जेवायला द्यावे लागते, अगदी लहान बाळाप्रमाणे! त्यामुळे ते तितक्याच वेळा शि-शु देखील करतात. त्यात शी अडवून ठेवण्याची क्षमता जास्त असते पण पिल्ले शु मात्र जास्त वेळ अडवून ठेवू शकत नाहीत. त्यामुळेच माझा मित्र शी साठी पिल्लाला १२ व्या मजल्यावरून खाली आणतो पण शु साठी, बाथरूम मध्येच व्यवस्था केलेली आहे. शि-शु थांबवून ठेवण्याची क्षमता, वयाप्रमाणे वाढत जाते. यासाठी अनेक युट्युब व्हिडियो उपलब्ध आहेत, ते पाहावेत. पिल्लांनी घरात शु केल्यास व्हिनेगरने ती जागा स्वच्छ करावी. शेवटी कितीही जरी तुम्ही प्रयत्न केलात तरी प्रत्येक कुत्रा, प्रत्येक व्यक्तीप्रमाणे वेगळा असतो, तुम्हाला त्याच्या स्वभावाचा अभ्यास करून सवयी लावाव्या लागतील, ही माहिती पूरक ठरू शकते.
टीप – शक्य असल्यास कुत्र्यांना शौचालयात आणि, बाहेर अशा दोन्ही सवयी लावाव्यात. अनेक वेळा, पावसाळ्यात देखील, कुत्र्यांना त्यांचे मालक बाहेर घेऊनच जातात. जागा एखाद्या उकीरड्याशेजारची निवडली जाते. कुत्री वास घेत राहतात, आणि काहीतरी चाटल्याने आजारी पडू शकतात. शिवाय पावसाळ्यात बाहेर घेऊन गेल्याने पाय, व पोटाला चिख्खल लागतो, त्यामुळे पुन्हा त्यांना स्वच्छ करावे लागते.
४. खाण्याच्या सवयी –
वर सांगितल्याप्रमाणे पिल्लू लहान बाळासारखेच असते. लहान पिल्लांचे देखील सेरेल्याक मिळते. पपी फूड देखील असते. ६ महिन्याचे होईपर्यंत ४ वेळा, नंतर अंदाज घेऊन कमी कमी करत १८ महिन्याचे झाले कि केवळ दिवसातून एकदाच जेवायला द्यावे. कुत्र्याच्या पिल्लाला किती खावे हे समजत नाही, त्यामुळे जशी लहान बाळांची खाण्यापिण्याची आपण काळजी घेतो तशीच काळजी त्यांची देखील घ्यावी लागते. लक्षात ठेवा, जर ३ वेळा जेवायला देत असाल तर तेवढा व्यायाम देखील आवश्यक आहे. अर्थात पहिलवानाचा खुराक देत असाल तर तसा व्यायाम देखील हवा. प्रौढ कुत्र्याला दिवसातून केवळ एकदाच जेवायला द्यावे. नाहीतर कुत्री लट्ठ होतात. कोणतीही जात असुदेत.
एक गैरसमज आहे कि बाहेरच्या जातीच्या कुत्र्यांना मांसाहारच द्यावा लागतो. खरं तर असे काही नाही, सर्व कुत्री मिश्राहारी असतात. मांसाहार पाहिजेच असे काही नाही. तुम्ही कुत्र्याला पूर्ण शाकाहारी देखील ठेवू शकता. माझ्या घरात माझी बायको चिकन शिजवून देत नाही, त्यामुळे मी प्लुटोला पेडिग्रीच देतो. (गृहकर्ज चालू झाल्याने पेडिग्री नाहीतर अगोदर रॉयल कॅनन द्यायचो.) बायको माहेरी गेली कि मग आम्ही घरात चिकन शिजवून खातो. आम्ही म्हणजे मी, प्लुटो आणि नेपचून(माझा बोका). तरीही मर्यादित आहार देऊन जर कुत्र्याचे पोट भरत नाही असे वाटत असेल तर कुत्र्याला काकडी/फायबर खायला द्यावे. फायबर कितीही खाऊदेत त्याने कुत्रा लट्ठ होणार नाही आणि त्याची भूक देखील भागेल. परंतु भावनेच्या आहारी जाऊन कुत्र्याला भरमसाठ खायला देऊ नये. कुत्र्यासमोर खंडीभर वाढून ठेवू नये. खाण्याच्या वेळा ठरवाव्या. खाण्याच्या वेळा ठरवल्या तर कुत्रा विशिष्ट वेळेस शी करेल, जे तुमच्यासाठी सोपे आहे. नाहीतर मध्यरात्री उठून देखील शी करू शकतो. प्लूटोच्या बाबतीत, या सर्व गोष्टींची पहिल्यापासून काळजी घेतली. पहिली २-२.५ वर्षे त्याला मी रॉयल कॅनन हेच अन्न द्यायचो, शिवाय अनेक विटामिन्स, आणि तत्सम गोळ्या चालू असल्याने पठ्या नेहमीच एकदम धडधाकट असतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, जे आरोग्याचे नियम आपल्याला लागू होतात तेच बहुतांशी त्यांना देखील लागू होतात. प्रवासाला जाणार असाल तर, अगोदर १-२ तास कुत्र्याला काहीही खायला देऊ नका. आपली आणि त्यांची उलटीची गोळी देखील सारखीच असते. कुत्र्याला मासे, पारले बिस्किटे, मैद्याचे पदार्थ असले काहीही खायला देऊ नये. चिकन चालेल पण, लहान लहान हाडे नकोत. मोठे पिस करून आणा. लहान लहान हाडे घशात अडकू शकतात. कुत्र्याला ग्लुटेन ची Allergy असू शकते. ग्लुटेन गव्हामध्ये असते, तेव्हा चपाती देत असाल आणि कुत्र्याला काही त्वचेच्या तक्रारी होत असतील तर डॉक्टरांशी बोलून यावर तोडगा काढावा. मला सांगायला आवडेल कि आजपर्यंत प्लुटोने एकदा देखील जेवण चुकवले नाही. अर्थात labrador थोडे खादाड असतात पण तरीही,,,,
५. कुत्र्याचा व्यायाम – अजून एक आव्हानात्मक काम.
कुत्रा लहान असताना म्हणजेच ३-४ महिन्याचा असताना ५ मिनिट आणि नंतर जसाजसा तो वयाने वाढत जाईल तसा प्रत्येक महिन्याला ५ मिनिट व्यायाम वाढवत जाणे योग्य आहे. साधारण १८ महिन्यांचा कुत्रा आपण पूर्ण वाढ झालेला कुत्रा समजलो तर १८*५ = ९० मिनिट, इतका वेळ त्यांना फिरवणे, कधीही चांगले. अर्थात त्यांच्याबरोबर आपलाही व्यायाम होतो.
फिरताना एक आव्हान असते ते म्हणजे, कुत्रा आपल्या पुढे पुढे चालत राहतो, किंवा आपल्याला ओढतो, मध्येच थांबून कुठे तरी वास घेत राहतो, यावर तुम्हाला काम करावे लागेल.
तुमचा कुत्रा नेहमी तुमच्या थोडासा मागे अशा पद्धतीने राहायला हवा. प्रत्येक ठिकाणी तुम्ही नेहमी पुढे आणि कुत्रा मागे असे चित्र असायला हवे. फिरून झाल्यावर बक्षीस म्हणून कुत्र्याला थोडा वेळ कुठे तरी वास घेण्यासाठी थांबवावे तेवढे पुरे. कुत्र्याबरोबर कसे चालावे यासाठी अनेक व्हिडियो युट्युब वर उपलब्ध आहेत.
मी आमच्या प्लुटोसाठी जेंटल लीडर नावाची वस्तू वापरतो. यामुळे कुत्र्यावर कसलेच बंधन राहत नाही. कुत्रा भुंकू व चावू देखील शकतो. केवळ जशी घोड्याची लगाम असते अगदी त्याच प्रमाणे ही कुत्र्याची लगाम म्हणू शकता, यामुळे तुम्ही अगदी निश्चिंतपणे कुत्र्याबरोबर योग्य पद्धतीने फिरू शकता.
टीप – कुत्रा बाहेर फिरायला घेऊन गेलात तर बाहेरची कुत्री नवीन नवीन त्रास देतील. पूर्ण दुर्लक्ष! काही करत नाहीत. एक लक्ष्मण रेषा ठरवा, ती जर रस्त्यावरच्या कुत्र्यांनी ओलांडली तरच प्रतिक्रिया द्या. तोपर्यंत गरज नाही. तुम्ही धीट तर तुमचा कुत्रा धीट! तुम्ही घाबरला तर तुमचा कुत्रा देखील घाबरणार.
६. कुत्र्याचे प्रशिक्षण – कुत्र्याला साध्या साध्या करामती वयाच्या ६ महिन्यांनंतर शिकवायला सुरुवात कराव्या. अनेक लोक कुत्र्यांना खूप लवकर अशा करामती शिकवण्याचा प्रयत्न करतात. मी देखील ही चूक करत होतो. ४ महिन्यांच्या पिल्लाला वेगवेगळ्या करामती शिकवायचा प्रयत्न करायचो. पण इतक्या लहानपणी त्यांना काहीच समजत नाही. ६ महिन्यांच्या पुढे ते एक एक गोष्ट शिकू लागतात, चांगली आणि वाईट देखील. पंजा देणे, गोल गोल फिरणे, बसणे, उठून उभे राहणे या साध्या साध्या गोष्टी कुत्र्यांना आपणच शिकवाव्यात त्यासाठी प्रशिक्षकाची गरजच नाही. त्यात मस्त मजा येते. कुठे स्पर्धेला वगैरे कुत्रा पाठवायचा असेल तर मग ठीक आहे प्रशिक्षक वगैरे, पण तुमच्याकडे वेळ असेल, तर तुम्हीच शिकवा. त्यातून मालक आणि कुत्रा हा एक खूप चांगला बंध तयार होण्यात मदत मिळते.
७. कुत्र्यांचे कुटुंबनियोजन –
सर्वात महत्वाचा मुद्दा! अनेक भारतीय डॉक्टर कुत्र्यांची कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करू नका म्हणतात. परंतु हे साफ चुकीचे आहे, उलट जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर ही शस्त्रक्रिया करून घ्यावी.
कारण –
अ – मानवेतर कुठलेही सजीव प्राणी, प्रणयक्रीडा क्रीडा म्हणून न करता, प्रजननाच्या शुद्ध हेतूने समागम करतात, आणि त्यामुळेच कुत्रा किंवा कुत्री विशिष्ट कालावधीतच समागम करतात, आणि यालाच कुत्र्यांचा हंगाम किंवा कुत्री माजावर येणे असेही म्हणतात आणि त्यामुळे कुत्र्यांची नसबंदी करून आपण कुठलेच पाप करत नाही, किंवा कुत्र्यांवर अन्यायदेखील करत नाही. पाश्चिमात्य देशांमध्ये याबाबत मोठे संशोधन झालेले आहे, तसेच तिकडे कुत्र्यांचे/पाळीव प्राण्यांचे कुटुंब नियोजन ही खूपच सर्वसामान्य गोष्ट आहे. आपण देखील एक सामाजिक जबाबदारी म्हणून, याकडे पाहिले पाहिजे! कारण आपल्या कुत्रा किंवा कुत्रीच्या प्रत्येकच पिल्लाला चांगले घर मिळेलच याची शास्वती नसते, आणि अशा पिल्लांचे रुपांतर रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांमध्ये तरी होते नाहीतर ही पिल्ले अपघातात, किंवा एखाद्या आजारात मरून जातात. कुत्रा/कुत्री त्यांच्या मालकासाठी मुलांप्रमाणे असतात, मग त्यांची पिल्ले ही नातवंडांसमान झाली, म्हणजे आपल्याला अजून प्रिय! मग या पिल्लांची हेळसांड होणे बरोबर आहे का?
ब – कुत्रा प्राणी, समागम क्रीडा म्हणून करत नाही त्यामुळे उलट अशा संबंधांची त्यांना धास्ती असते. भिलेल्या अवस्थेत कुत्र्यांची जी मानसिक अवस्था असते साधारण तीच अवस्था समागमाच्या वेळेस आढळून आलेली आहे. कुत्रा भिल्यावर किंवा तणावाखाली असताना त्याचे कान मागे जातात, आणि अगदी तसेच शारीरिक बदल समागमाच्या वेळेस देखील पहायला मिळतात. ही केवळ कुत्र्यांच्या प्रजननासंदर्भातील एक नैसर्गिक क्रिया आहे.
क – मनुष्येतर प्राण्यांना, विवेक नसतो. त्यामुळे अशा, हंगामाच्या वेळेस कुत्र्यांना स्वतःवर ताबा रहात नाही. ही अवस्था मांजरांची, गायी-बैलांची आणि अगदी हत्तीसारख्या इतर प्राण्यांचीदेखील असते, आणि यामुळे हे प्राणी नियंत्रणाबाहेर जातात. आपण अनेक वेळा कुत्रा हरवल्याच्या जाहिराती पाहतो, त्याचे हे एक मुख्य कारण आहे.
एखादी कुत्री जेव्हा वयात येते, तेव्हा तिच्या मुत्रातून त्या हंगामापुरता एक विशिष्ट गंध येतो जो अनेक मैल लांब असलेल्या कुत्र्यांनादेखील आकर्षित करतो. मग तो पाळीव कुत्रा जरी असला तरीही कशाचीही पर्वा न करता, गंधाच्या शोधात, घर सोडून दूरपर्यंत जातो आणि पुन्हा घरचा रस्ता न मिळाल्याने हरवतो. अशा वेळेस कुत्र्यांनी ५-६ फुट उंच कुंपणावरून उडी मारून पळून गेल्याची देखील उदाहरणे आहेत, तसेच स्वतःवर ताबा न राहिल्याने चवताळून, आक्रमक होऊन आपल्याच मालकाला चावल्याची उदाहरणे देखील आहेत.
इ – त्याचप्रमाणे अनेक वाईट सवयी जसे उड्या मारणे, उगाच भुंकणे यांना आवर घालायचा असेल तर जितक्या लवकर कुत्र्याची कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करता येईल तितक्या लवकर करावी.
ई – याशिवाय या शस्त्रक्रियेमुळे किडनी चे विकार देखील आटोक्यात राहण्यास मदत मिळते. कारण अनेक कुत्र्यांना मूत्राशयाचा cancer होतो आणि त्यात कुत्री दगावतात.
८. कुत्र्यांना कपडे घालणे – हौशी मालक कुत्र्यांना कपडे घालायचा अट्टाहास करतात. खरं तर भारतीय जातीच्या कुत्र्याला थंडीत एखादा स्वेटर घातला तरीही हरकत नाही. पण ज्या कुत्र्यांना डबल कोट असतो, उदा. गोल्डन रिटरीवर, Labrador, जर्मन शेपहर्ड या कुत्र्यांना किमान भारतीय वातावरणात तरी स्वेटरची गरज पडत नाही. दिल्ली किंवा उत्तर भारतात, जिथे खूप थंडी पडते, तिथे अशा जातीच्या कुत्र्यांना स्वेटर घालण्याची गरज पडू शकते.
९. कुत्र्यांची स्वच्छता –
अ – आंघोळ – लहान पिल्लांना आंघोळ घालायचा अट्टाहास करू नये. त्यांचा ड्राय शांपू असतो, तो शांपू स्प्रे प्रमाणे त्यांच्या अंगावर मारावा आणि कोरड्या फडक्याने पुसून घ्यावे. कुत्रा मोठा झाला तरी, सतत आंघोळीचा अट्टाहास नको. त्याने त्यांच्या अंगातील तेल कमी होऊन त्वचा कोरडी पडते आणि खाज सुटते. काही लोक माणसांच्या शांपूने/साबणाने/अजून स्वच्छ म्हणून dettol ने कुत्र्याला आंघोळ घालतात जे पूर्णपणे चुकीचे आहे. Dettol आपल्या आंघोळीच्या पाण्यात जास्त पडले तरी आपले अंग खाजते त्यांना तर Dettol हा प्रकारच चालत नाही. कुत्र्यांचे खास वेगळे शांपू असतात ते वापरावे, आणि साधारण, महिन्यातून एकदा आंघोळ घालावी.
ब – कुत्र्यांची नखे – कुत्र्यांची नखे वाजायला लागली कि कापावीत. कुत्रा फरशीवरून चालताना नखांचा आवाज येतो त्यावरून ओळखावे कि, नखे कापायची वेळ आली आहे. कुत्र्यांची नखे घरच्या घरी कापू शकता, पण त्यासाठी मालकाचं आणि कुत्र्याचं नात घट्ट असायला हवं! जस माझं आणि प्लुटोचं आहे. कारण, त्यांच्या नखांमध्ये रक्त वाहिन्या असतात त्यामुळे विशिष्ट मर्यादेपर्यंतच तुम्ही नखे कापू शकता, त्यापुढे गेल्यास कुत्र्याला इजा होऊ शकते, आणि कुत्रा केवळ इजा झाली म्हणून नखे कापणाऱ्याला चावू शकतो. मी एक-दोनदा अशी चूक करणार होतो, प्लुटो मला चावण्यासाठी तोंड पुढे घेऊन आला पण चावला नाही. हे खूप काळजीपूर्वक करण्यासारखे काम आहे. नखे कापणे अनुभवाने चांगले जमू शकते.
क – कुत्र्यांचे कान – कान नियमित पणे तपासावेत. आजपर्यंत मी अनेकवेळा प्लुटोचे कान तपासले आहेत परंतु कधीच प्लूटोच्या कानात मला कसलीच घाण दिसली नाही. त्याचे एक कारण म्हणजे Labrador चे कान पडलेले असतात त्यामुळे कानात धूळ किंवा माती कमी जाते याउलट ज्या कुत्र्यांचे कान टवकारलेले असतात, त्यांची जास्त काळजी घेण्याची गरज आहे. इयर बड्सने वेळोवेळी कान स्वच्छ करावेत.
ड – कुत्र्यांचे केस – वर्षातून २ वेळा कुत्र्याचे केस गळतात.
माझ्या अनुभवानुसार वातावरणात उकाडा वाढला कि केस गळायला सुरुवात होते. कुत्राचे केस गळतातच. त्याला उपाय नाही.
कुत्र्याचे केस दर २ दिवसांनी विंचरावे. त्यामुळे तुटलेले किंवा मृत केस आपण एकाच ठिकाणी गोळा करू शकतो, परिणामी घरात कमी केस पडतात. त्यांची काही औषधे देखील असतात, ती औषधे दिली तरी हे प्रमाण कमी होऊ शकते पण पूर्णपणे थांबू शकत नाही.
कुत्र्यांचे वेळेवर डी-वर्मिंग करावे. डी-वर्मिंग म्हणजे जसे आपण लहान मुलांना जंताचे औषध देतो तो प्रकार. केवळ डी-वर्मिंग वेळेवर न केल्याने देखील कुत्र्याचे केस गळू शकतात. त्यांच्या वजनाप्रमाणे त्यांना गोळ्या द्याव्या लागतात. डॉक्टरांना विचारून योग्य गोळ्या निवडाव्या.
मी प्लूटोच्या केसगळतीवर, उपाय म्हणून फर्मिनेटर नावाचा कंगवा विकत घेतला आहे. या कंगव्याने ९०% पर्यंत केस गळती थांबते, अर्थात केस गळतातच पण कंगवा विशिष्ट पद्धतीचा असल्याने, बहुतांश मृत केस तो बरोबर काढतो. येत्या १०-१५ दिवसात येईल. अशी उत्पादने भारतात मिळत नाहीत, त्यासाठी तुम्ही ग्लोबल इबे या संकेत स्थळावर जाऊन विकत घ्या. अतिशय विश्वासार्ह संकेतस्थळ आहे.
इ – पिसवा आणि टिक्स
कुत्र्यांच्या अंगावर पिसवा आणि टिक्स येतातच. तुम्ही काहीही करा. यावर उपाय म्हणजे, नियमितपणे त्यांची तपासणी करत राहणे. कुत्र्याला फिरायला नेले कि जास्त झुडपात न नेणे. रस्त्यावरील कुत्र्यांच्या संपर्कात येऊ न देणे. AntiTicks शांपू वापरला तर मोठ्या प्रमाणात याला आळा बसतो. परदेशात खूप चांगली उत्पादने आहेत पण आपल्याकडे अशी उत्पादने सहजा सहजी मिळत नाहीत. साधारण तशीच पण कमी प्रभावी उत्पादने मिळतात. डॉक्टरांशी बोलून योग्य ते औषध/शांपू वापरावेत.
१०. कुत्र्यांचे दात सळसळणे – हा प्रकार खूप त्रासदायक आणि आर्थिक नुकसान करणारा आहे. कुत्र्यांना लहानपणी जे मिळेल ते चावायची सवय असते, अगदी लहान बाळांसारखी. त्यात सगळ्यात प्रिय म्हणजे आपले बूट! अनेक लोकांचे बूट त्यांची कुत्री चावून खराब करतात. बाकी देखील उदा. आहेत जसे माझ्या एका मैत्रिणीची खूप महागाची साडी तिच्या कुत्र्याने चावून चावून फाडली. यासाठी कितीही खेळणी घ्या काही फरक पडत नाही. कुत्रा दमला पाहिजे. शारीरिक आणि बौद्धिक दोन्ही पद्धतीने.
शारीरिक – भरपूर व्यायाम, भरपूर चालणे
बौद्धिक – प्रशिक्षण! वेगवेगळ्या करामती ज्याने बुद्धीवर ताण पडेल.
या दोन गोष्टी जर नित्य नियमाने केल्या तर वस्तू चावण्याची सवय कमी होऊ शकते.
११. कुत्रा अंगावर उड्या मारणे/गुरगुरणे – काही मालकांना हा प्रकार कौतुकास्पद वाटतो. पोमेरीयन जातीची कुत्री असतील तर एवढे काही वाटत नाही, पण मोठ्या जातींची कुत्री असतील तर, मात्र यावर काम करावे लागेल.
बाहेरून आल्यावर कुत्र्याकडे लक्ष न देणे, हा एकमेव पर्याय आहे. घरात कुत्रा नाहीच या पद्धतीने वागावे. कुत्र्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहू नये. अशाने त्यांचा गैरसमज होतो कि समोरचा त्याच्याकडे लक्ष देतो आहे. ओळखिची व्यक्ती असेल तर, कुत्रा लाडात येतो आणि अनोळखी व्यक्ती असेत तर काही कुत्री याचा चुकीचा अर्थ काढतात. त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहणे म्हणजे, त्यांना आव्हान देणे हा अर्थ काढला जातो, त्यामुळे अनोळखी लोकांच्या अंगावर गुरगुरणे, चावणे असले प्रकार घडतात. त्यामुळे कोणाच्याही जेव्हा घरी जाल आणि तिथे कुत्रा असेल तर पूर्ण दुर्लक्ष करा. शरीराच्या हालचाली चोरासारख्या, घाबरलेल्या नकोत, राजासारख्या आणि धीट असुद्यात.
१२. कुत्रा गटात राहणारा प्राणी – कुत्रा गटात/कळपात राहणारा प्राणी असल्याने त्याच्या सर्व सवयी तशाच असतात. कधीही कुत्र्याला तुमच्या अगोदर खाऊ देऊ नये. नेहमी तुम्ही अगोदर आणि कुत्रा नंतर/शेवटी. निसर्गात हेच होते, जो सर्वश्रेष्ठ/नायक कुत्रा असेल तो प्रथम अन्नग्रहण करतो, त्याच्यानंतर बाकी! कुत्र्याने आपण आज्ञा दिल्याशिवाय अन्नग्रहण करू नये याचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. कुठेही जाता-येता तुम्ही अगोदर, आणि कुत्रा नंतर हेच चित्र असायला हवे. अशाने तुम्ही कुत्र्याच्या दृष्टीने नायक होता आणि त्याला बाकी सवयी लावणे कठीण जात नाही. हेच जर उलट झाले तर कुत्रा घरातील सर्व व्यक्तींवर आधिपत्य गाजवतो. ज्यामुळे काही काळाने कुत्रा डोकेदुखी ठरू शकतो. मग उगाच भुंकणे, लोकांवर धावून जाणे, घरातील लोकांनाच चावणे असले प्रकार होतात.
१३. लसीकरण – डॉक्टर योग्य पद्धतीने मार्गदर्शन करतात. मी प्लुटोला ८ इन १ ही लस दरवर्षी देतो! तेवढी पुरे..
तर वरील सर्व माहिती, ही माझ्या अनुभवाप्रमाणे/अभ्यासाप्रमाणे लिहिलेली आहे. अनेक मुद्दे अजूनही अनुत्तरीत असतील, मला याची कल्पना आहे.
तरीही अजून काही माहिती हवी असल्यास, माझ्या ईमेल आयडीवर संपर्क साधावा.
Suchikant@Gmail.Com